Sunday, July 6, 2025

माउलींच्या पालखी सोहळ्यातील आजरेकर दिंडी अनुभवती स्मशान वैरागाच्या आनंद





भंडीशेगाव येथे आजरेकर दिंडीचा असतो स्मशानांमध्ये मुक्काम,

----- 

परिसराची स्वच्छता करून दिंडीतील वारकरी करतात नामस्मरण, महिला वारकरी करतात स्वयंपाक, सर्वजण मिळून करतात भोजनही स्मशानभूमीतच

----

© विनोद कामतकर,

आषाढी वारी सोहळ्याचे अनेक अदभूत पैलू आहेत. निरंतर वारी करणाऱ्यांना प्रत्येकवेळी नवीन गोष्टींची अनुभूती अन् वेगळेपण या सोहळ्यामध्ये पहायला मिळते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गुरु बाबासाहेब आजरेकर ही दिंडीचा मुक्काम भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे स्मशानभूमीमध्ये असतो. त्या दिंडी सोहळ्यातील सर्व महिला, पुरुष त्याच ठिकाणी मुक्काम करतात, देवाचे नामस्मरण, स्वयंपाक अन् भोजन करून त्याच ठिकाणी विश्रांती देखील घेतात. आजरेकर दिंडी अनेक वर्षांपासून भंडीशेगावमध्ये स्मशानभूमीमध्ये मुक्कामी असते, हे दिंडी सोहळ्याचे वेगळेपण आहे.



माउलींच्या सोहळ्यामध्ये रथामागे २३ क्रमांकाची दिंडी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरेकर यांची आहे. पंरपरेनुसार भंडीशेगावी या दिंडीचा मुक्काम स्मशानभूमीत असतो. तेथील अस्थी, राख अथवा इतर साहित्या बाजूला करून दिंडीतील वारकरी त्या ठिकाणी आराम करीत होते. दिंडी स्मशानभूमीत कशी? असा प्रश्न निर्माण झाल्याने त्या दिंडीतील वारकऱ्यांशी  संवाद साधला.  त्यावेळी बोलताना, “श्री. गुरव म्हणाले,“तुका म्हणे येथे वैराग्य राहिले दूरी, परी न ठाकिले दूरी काय चिंतावे...’  वैराग्य हे स्मशनामध्ये असून शिवभोळ्या शंकराकडून ते शिकावे, असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. वारी सोहळ्यामध्ये स्मशानी वैराग्याचा अविस्मरणीय अनुभव भंडीशेगाव येथील दीड दिवसांच्या मुक्कामी आमच्या दिंडीतील सर्व वारकरी मोठ्या आनंदाने घेतात. आमच्या दिंडी सोहळ्यात २०० पेक्षा जास्त वारकरी आहेत. दीड दिवसांच्या मुक्कामात भजन, किर्तन, भोजन अन् विश्रांती आम्ही याच ठिकाणी घेतो.”






तानाजी पाटील महाराज म्हणाले,“बाबा आजरेकर यांची सातवी पिढी दिंडी सोहळ्यात असून मी स्वत: मागील २५ वर्षांपासून वारीला येतोय. स्मशानभूमी अपवित्र असे समजले जाते. पण, आम्हाला कधीही काही जाणवले देखील नाही. भिती किंवा स्वप्नातही त्या संदर्भातील विचार आमच्या मनात देखील आलेले नाहीत. काही वर्षांपूर्वी आमची दिंडी भंडीशेगावमध्ये असताना, या स्मशानभूमीत एका महिलेवर नुकतेच अत्यंस्कार झाले होते. त्याच दरम्यान खूप मोठा पाऊस झाल्याने हवेत गारवा वाढलेला होता. आमच्या दिंडीतील वारकरी जणू शेकोटी प्रमाणे त्या चितेच्या सभोवताली बसले होते. भंडीशेगावात दीड दिवसांचा दिंडीची मुक्काम असल्याने दुसऱ्या दिवशी तेथील राख आम्ही बाजूला काढून ठेवली. परिसर स्वच्छ करून त्याच ठिकाणी आम्ही विश्रांती देखील घेतली होती. दिंडीतील महिला वारकरी देखील येथे थांबतात. तसेच, स्वयंपाक देखील याच ठिकाणी करतात, सर्वजण मिळून भजन, भोजन केल्यानंतर येथे विश्रांती देखील घेतो. 

हरि उच्चारण मंत्र पै अगाध । पळे भूतबाधा भेणे तेथें ॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । असे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात आहे. 




संत तुकाराम महाराजांनी “आम्हा भय चिंता नाही धाक | जन्म मरण नाही एक | झाला इहलोकी परलोक | आले सकळीक वैकुंठ, असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे देवाचे नामस्मरण करणाऱ्यांना कशाहीची चिंता, भिती वाटत नाही असे, पाटील महाराज यांनी सांगितले.

----------

Tuesday, May 20, 2025

मधमाशी : पर्यावरणातील परिस...

---------------
 जागतिक मधुमक्षिका दिन विशेष…

----
विनोद कामतकर

9850434353
---
पर्यावरणातील पशु, प्राणी, पक्षी व किटक प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे पर्यावरणाच्या विकासासाठी कारणीभूत ठरतात. आपल्यास लाभलेल्या जैविक संपत्तीमध्ये मधमाशांचे अनन्यसाधारण महत्व आहे. मधमाशी हा शत्रू किटक नसून तो मित्र किट आहे,  याची जाणीव सर्वांना असणे महत्वाचे असून त्या पर्यावरणातील परिस आहेत. झाडांची बेसुमार तोड, कीटकनाशकांचा अतिरेक वापरामुळे मधमाश्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

दरवर्षी २० मे जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा होतो. मधमाश्या, वनस्पती, पिकं यांच्यातील सहजीवन सगळ्यांसाठी कल्याणकारी असते. मधमाश्यांच्या फुलातील हालचालींमुळे म्हणजे परागीकरणाच्या क्रियेमुळे फलधारणा घडते.  सपुष्प वनस्पतींचे अस्तित्व मधमाशांवर विसंबून असते. आपल्या जेवणातील तीन घासांपैकी एक घास मधमाशअयांमुळे मिळतो. त्यांच्याकडून आपल्याला पौष्टिक मध मिळतो. 

शास्त्रीय पद्धतीने मधमाशापालन व्यवसाय करून मधाशिवाय मेण, पराग, रॉयल जेली (राजान्न) मिळते. त्याचा वापर निरोगी, दीर्घायुष्यासाठी करु शकतो. मधमाशांमुळे पिकांमध्ये त्वरीत परागीकरण घडते. पीक, फलोत्पादनात दुपटीपेक्षा अधिक वाढ होते. कृषी उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. शेत-शिवारातील मोहोळ म्हणजे समृद्धी, शुभशकुन समाजावे. त्यामुळे मधमाशी हरितक्रांतीच्या शिल्पकार असून पर्यावरणातील अन्न साखळ्या सबलीकरणासाठी कारणीभूत ठरतात. त्यांचा क्वचित प्रसंगीचा डंख गुणकारी ठरु शकतो. त्यांचे विष सुद्ध काही दुर्धर आजारासाठी गुणकारी ठरते. 

------
दत्त महाराजांचे गुरु....
श्री दत्त महाराजांनी २४ गुरु केले. त्यामध्ये मधमाशीला त्यांनी गुरु केले आहे. मधमाशी अनेक अडचणींना सामना करून मध गोळा करते. तोच मधसाठा तिच्यासाठी घातक ठरतो. कुणाच्या दृष्टीस पडू नये अशा कड्या-कपारीमध्ये किंवा उंच ठिकाणी मधमाशी पोळे बांधून त्यामध्ये मधाचा साठा करते. पण, मध पळविणारे लोक अचूकपणे तो मध पळवितात. त्याप्रमाणे आवश्यकतेहून जास्त संचय करणे योग्य नाही, असा संदेश दत्तमहाराजांनी गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिला आहे. 
---

माणसांच्या चुकांमुळेच..
.

मुंग्या, मधमाश्या, कीटक, गांडुळे, वटवाघूळ, साप पक्षी असेच सर्वच जीव शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत करतात. यात मधमाश्या आघाडीवर असतात. त्यांचे महत्व अबाधित आहे. फुलांचे फळात रुपांतर करण्यात मधमाश्या पटाईत असता. त्याशिवाय दुसरे कीटक हे काम करु शकत नाहीत. पूर्वी मधमाशांची पोळी प्रामुख्याने काटेरी झाडीवर असायची. पण, अलीकडच्या काळात ही पोळी जांभूळ, आंबा, नारळ झाडांसह घरात, भिंतींवर दिसू लागली आहेत. माणसांच्या चुकांमुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवास बदल केलाय, तो फक्त माणसांच्या चुकांमुळेच.

----
मधमाशीपालन कृषिपूरक व्यवसाय

मधमाशी पालन हा चागंला कृषिपूरक व्यवसाय आहे. खादीग्रामोद्योग महामंडळ, महाबळेश्वर येथील मधुमक्षिका पालन केंद्रातर्फे त्याचे प्रशिक्षण देण्यात येते. याद्वारे चांगला रोजगार मिळतो. डाळींब व वेलवर्गीय प्रजातींच्या पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मधमाशी खूप महत्वाचे माध्यम आहे. मधमाशी पेट्या भाडोत्री देण्याचा व्यवसायाद्वारे रोजगार चागंला रोजगार मिळतो, असे प्राणीशास्त्रच्या अभ्यासिका प्रा. रश्मी माने यांनी सांगितले. 

------

‘मधमाशी मित्र’ संकल्पनेची गरज..

मधमाशांचे पोळं जाळण्याचा अघोरी प्रकार अनेक ठिकाणी घडताेय. मोठी झाडं नसल्याने मधमाशी शेत-शिवारातून शहराकडे येत आहेत. शास्त्रीय पद्धतीने मधमाशांना त्रास होऊ न देता पोळे काढण्याचे प्रशिक्षणाची गरज आहे. प्राणीमित्र, सर्प मित्रांप्रमाणे आता ‘मधमाशी मित्र’ या संकल्पना कृतीशील होण्याची गरज असल्याचे, पर्यावरण स्नेही मीना मोकाटे यांनी सांगितले. 

-----

मधमाशी विविध प्रकारच्या वनस्पतींचे परागीभवन मधमाशाच करु शकतात. त्यांचे प्रमाण कमी झाल्यास आपल्या खाद्यापदार्थताली अनेक घटक, वनस्पतींच्या प्रजाती  नष्ट होऊन अन्नधान्याचा तुटवडामुळे भूकबळी वाढण्याचा धोका आहे. मधमाशांचे महत्व वेळी आेळखून त्यांचे संरक्षण, संवर्धन आवश्यक. स्थानिक वृक्ष लागवडीला  प्राधान्य द्यावे. सर्वच कीटकांना शत्रू नाहीत. रासायनिक औषधांचा अतिरेक बंद व्हावा. शाश्वत शेतीकडे वेळीच न वळणे हाच शेवट पर्याय आहे, असे  पर्यावरणशास्त्र अभ्यासिका प्रिया फुलंब्रीकर सांगतात. 




Saturday, March 29, 2025

गवताळ माळरान गवताळ माळरानची सफारी

गवताळ माळरानची सफारी..

. ____

 रानवेध.. 

 _____

 _जंगल हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहते ते घनदाट झाडी, वाघ बिबट्याची डरकाळी, मुक्तविहार करणारे चिकार, चितळ हे हरिण कुळातील प्राणी असे चित्र डोळ्यांसमोर उभारते. चित्रपट अथवा दूरचित्रवाणीवर पाहिलेल्या जंगलाच्या संकल्पनेस सोलापुरातील उघड्याबोडक्या मला जंगल पाहताना छेद जातो. जंगल अन तेही माळरानाचे, ही संकल्पना काहींना लवकर पचनी पडत नाही. पण, उघड्या बोडक्या वाटणाऱ्या सोलापुरातील माळरानावर जैवविविधता, समृद्धतेने नटलेली आहे, हीच तर सोलापूरची समृद्धता.

 'गवताळ माळरानाचा राजा' अशी उपाधी असणारा माळढोक व तणमोरपक्षी, हे सोलापूरचे भूषण. जगभरातच त्यांची संख्या घटली असून सोलापूर देखील त्या अपवाद असणार. पण, क्वचितप्रसंगी का असेना हा गवताळ माळाचा राजा हमखास दर्शन देतो. अशा या येथील समृद्ध माळरानात वनविभागाने सफारी सुरू केली आहे. विविध प्रकारचे वन्यप्राणी, शिकारी पक्षी, माळरानांवरचे पक्षी आणि फुलपाखरे पाहण्याची संधी सोलापूर येथील बोरामणी गवताळ सफारीच्या माध्यमातून निसर्गप्रेमींना अनुभवत आहेत. त्यास राज्यभरातून प्रतिसाद वाढत असून सोलापूरच्या निसर्ग पर्यटनास नव संजीवनी मिळाली आहे. पुणे, मुंबई, हैदराबाद येथील काही पर्यटकांनी नुकताच येथील सफारीचा आनंद घेतला काहींनी तर माळाराणावरील माचानावर रात्रभर मुक्काम ठोकून प्राण्याचे निरीक्षण केले. येथे पर्यटकांसाठी ऑनलाइन आरक्षणाची सोय सफारीसाठी ऑनलाइन आरक्षणाची सोय करण्यात आली आहे. बारामती आणि इंदापूर भागातील वनविभागाच्या माळरानांवर वन विभागाने गेल्या वर्षी सुरू केलेल्या गवताळ सफारीला पर्यटकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर सोलापूर देखील पर्यटनाचे नवे क्षेत्र विस्तारत आहे. दोन महिन्यांपूर्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते याचा शुभारंभ झाला. तत्कालीन उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, पुण्याचे मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण यांच्या पुढाकारातून ही संकल्पना गतिमान झाली आहे. __ हे प्राणी पाहता येतील बोरामणी माळरानांवर लांडगा, कोल्हा, खोकड, काळवीट, नीलगाय, रानससा, रानडुक्कर, रानमांजर, उदमांजर, म्हसण्या मांजर आणि माळसरडा यांचा अधिवास आहे. तसेच सर्पमार गरुड, मॉन्टेक्यूचा भोवत्या, मोर, खंड्या, पिवळ्या गाठीची माळ टिटवी, सातभाई व्हल्ले, हरियालसह विविध प्रकारचे शिकारी पक्षी आणि आणि माळरानांवरचे पक्षी आणि फुलपाखरे बघायला मिळतील.ॉ

 ___ 

 बोरामणी गवताळ सफारीचे ऑनलाईन बुकींग सुरु सफारी ही दोन टप्यात करण्यांत आली असून, सकाळची वेळ 6:30 ते 10:30 आणि दुपारची वेळ 3:30 ते 6:30 ठेवण्यात आली आहे. 

 __ 

 बोरामणी गवताळ सफारी येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मचाण, शौचालय इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. सदरची सफारी ही स्वतःच्या गाडीने करावयाची असून, सोलापूर वनविभागातर्फे गाईड घेणे बंधनकारक आहे. यामध्ये सफारी ५०० शुल्क सोबत गाईड ५०० रुपये, कॅमेरा (असल्यास) १००/-शुल्क असे एकूण फी रु. ११००/- आकारण्यांत येणार आहे. बुकींग करतेवेळी सदरचे पेमेंट ऑनलाईन पध्दतीने करता येईल. सफारीच्या वेळेस एका वेळी ४ ते ५ गाड्या सोडण्यांत येतील. ___ 

बोरामणी येथे सफारी सोबत नाईट स्टेची सोय करण्यात आलेली आहे. तरी या नाईट स्टे साठी एक वेळेस 4 व्यक्ती (प्रत्येक व्यक्ती रु. २५०/ शुल्क) असे एकूण रु. १०००/- शुल्क व सोबत सोलापूर वनविभागातर्फे दिला जाणारा गाईड रु. ५००/- शुल्क असे एकूण रु. १५००/-शुल्क देऊन आपण संपूर्ण रात्र मंचानवरती नाईट स्टे करु शकता व निसर्गचा अनुभव घेऊ शकता. सदर ऑनलाईन बुकिंग फोन पे, गुगल पे व इतर ऑनलाईन बँकिंगव्दारे करता येईल, असे सहाय्यक उपवनसंरक्षक अजित शिंदे यांनी सांगितले. 

 ___