भंडीशेगाव येथे आजरेकर दिंडीचा असतो स्मशानांमध्ये मुक्काम,
-----
परिसराची स्वच्छता करून दिंडीतील वारकरी करतात नामस्मरण, महिला वारकरी करतात स्वयंपाक, सर्वजण मिळून करतात भोजनही स्मशानभूमीतच
----
© विनोद कामतकर,
आषाढी वारी सोहळ्याचे अनेक अदभूत पैलू आहेत. निरंतर वारी करणाऱ्यांना प्रत्येकवेळी नवीन गोष्टींची अनुभूती अन् वेगळेपण या सोहळ्यामध्ये पहायला मिळते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गुरु बाबासाहेब आजरेकर ही दिंडीचा मुक्काम भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे स्मशानभूमीमध्ये असतो. त्या दिंडी सोहळ्यातील सर्व महिला, पुरुष त्याच ठिकाणी मुक्काम करतात, देवाचे नामस्मरण, स्वयंपाक अन् भोजन करून त्याच ठिकाणी विश्रांती देखील घेतात. आजरेकर दिंडी अनेक वर्षांपासून भंडीशेगावमध्ये स्मशानभूमीमध्ये मुक्कामी असते, हे दिंडी सोहळ्याचे वेगळेपण आहे.
माउलींच्या सोहळ्यामध्ये रथामागे २३ क्रमांकाची दिंडी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरेकर यांची आहे. पंरपरेनुसार भंडीशेगावी या दिंडीचा मुक्काम स्मशानभूमीत असतो. तेथील अस्थी, राख अथवा इतर साहित्या बाजूला करून दिंडीतील वारकरी त्या ठिकाणी आराम करीत होते. दिंडी स्मशानभूमीत कशी? असा प्रश्न निर्माण झाल्याने त्या दिंडीतील वारकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना, “श्री. गुरव म्हणाले,“तुका म्हणे येथे वैराग्य राहिले दूरी, परी न ठाकिले दूरी काय चिंतावे...’ वैराग्य हे स्मशनामध्ये असून शिवभोळ्या शंकराकडून ते शिकावे, असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. वारी सोहळ्यामध्ये स्मशानी वैराग्याचा अविस्मरणीय अनुभव भंडीशेगाव येथील दीड दिवसांच्या मुक्कामी आमच्या दिंडीतील सर्व वारकरी मोठ्या आनंदाने घेतात. आमच्या दिंडी सोहळ्यात २०० पेक्षा जास्त वारकरी आहेत. दीड दिवसांच्या मुक्कामात भजन, किर्तन, भोजन अन् विश्रांती आम्ही याच ठिकाणी घेतो.”
तानाजी पाटील महाराज म्हणाले,“बाबा आजरेकर यांची सातवी पिढी दिंडी सोहळ्यात असून मी स्वत: मागील २५ वर्षांपासून वारीला येतोय. स्मशानभूमी अपवित्र असे समजले जाते. पण, आम्हाला कधीही काही जाणवले देखील नाही. भिती किंवा स्वप्नातही त्या संदर्भातील विचार आमच्या मनात देखील आलेले नाहीत. काही वर्षांपूर्वी आमची दिंडी भंडीशेगावमध्ये असताना, या स्मशानभूमीत एका महिलेवर नुकतेच अत्यंस्कार झाले होते. त्याच दरम्यान खूप मोठा पाऊस झाल्याने हवेत गारवा वाढलेला होता. आमच्या दिंडीतील वारकरी जणू शेकोटी प्रमाणे त्या चितेच्या सभोवताली बसले होते. भंडीशेगावात दीड दिवसांचा दिंडीची मुक्काम असल्याने दुसऱ्या दिवशी तेथील राख आम्ही बाजूला काढून ठेवली. परिसर स्वच्छ करून त्याच ठिकाणी आम्ही विश्रांती देखील घेतली होती. दिंडीतील महिला वारकरी देखील येथे थांबतात. तसेच, स्वयंपाक देखील याच ठिकाणी करतात, सर्वजण मिळून भजन, भोजन केल्यानंतर येथे विश्रांती देखील घेतो.
हरि उच्चारण मंत्र पै अगाध । पळे भूतबाधा भेणे तेथें ॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । असे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात आहे.
संत तुकाराम महाराजांनी “आम्हा भय चिंता नाही धाक | जन्म मरण नाही एक | झाला इहलोकी परलोक | आले सकळीक वैकुंठ, असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे देवाचे नामस्मरण करणाऱ्यांना कशाहीची चिंता, भिती वाटत नाही असे, पाटील महाराज यांनी सांगितले.
----------




