Sunday, July 6, 2025

माउलींच्या पालखी सोहळ्यातील आजरेकर दिंडी अनुभवती स्मशान वैरागाच्या आनंद





भंडीशेगाव येथे आजरेकर दिंडीचा असतो स्मशानांमध्ये मुक्काम,

----- 

परिसराची स्वच्छता करून दिंडीतील वारकरी करतात नामस्मरण, महिला वारकरी करतात स्वयंपाक, सर्वजण मिळून करतात भोजनही स्मशानभूमीतच

----

© विनोद कामतकर,

आषाढी वारी सोहळ्याचे अनेक अदभूत पैलू आहेत. निरंतर वारी करणाऱ्यांना प्रत्येकवेळी नवीन गोष्टींची अनुभूती अन् वेगळेपण या सोहळ्यामध्ये पहायला मिळते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील गुरु बाबासाहेब आजरेकर ही दिंडीचा मुक्काम भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे स्मशानभूमीमध्ये असतो. त्या दिंडी सोहळ्यातील सर्व महिला, पुरुष त्याच ठिकाणी मुक्काम करतात, देवाचे नामस्मरण, स्वयंपाक अन् भोजन करून त्याच ठिकाणी विश्रांती देखील घेतात. आजरेकर दिंडी अनेक वर्षांपासून भंडीशेगावमध्ये स्मशानभूमीमध्ये मुक्कामी असते, हे दिंडी सोहळ्याचे वेगळेपण आहे.



माउलींच्या सोहळ्यामध्ये रथामागे २३ क्रमांकाची दिंडी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरेकर यांची आहे. पंरपरेनुसार भंडीशेगावी या दिंडीचा मुक्काम स्मशानभूमीत असतो. तेथील अस्थी, राख अथवा इतर साहित्या बाजूला करून दिंडीतील वारकरी त्या ठिकाणी आराम करीत होते. दिंडी स्मशानभूमीत कशी? असा प्रश्न निर्माण झाल्याने त्या दिंडीतील वारकऱ्यांशी  संवाद साधला.  त्यावेळी बोलताना, “श्री. गुरव म्हणाले,“तुका म्हणे येथे वैराग्य राहिले दूरी, परी न ठाकिले दूरी काय चिंतावे...’  वैराग्य हे स्मशनामध्ये असून शिवभोळ्या शंकराकडून ते शिकावे, असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. वारी सोहळ्यामध्ये स्मशानी वैराग्याचा अविस्मरणीय अनुभव भंडीशेगाव येथील दीड दिवसांच्या मुक्कामी आमच्या दिंडीतील सर्व वारकरी मोठ्या आनंदाने घेतात. आमच्या दिंडी सोहळ्यात २०० पेक्षा जास्त वारकरी आहेत. दीड दिवसांच्या मुक्कामात भजन, किर्तन, भोजन अन् विश्रांती आम्ही याच ठिकाणी घेतो.”






तानाजी पाटील महाराज म्हणाले,“बाबा आजरेकर यांची सातवी पिढी दिंडी सोहळ्यात असून मी स्वत: मागील २५ वर्षांपासून वारीला येतोय. स्मशानभूमी अपवित्र असे समजले जाते. पण, आम्हाला कधीही काही जाणवले देखील नाही. भिती किंवा स्वप्नातही त्या संदर्भातील विचार आमच्या मनात देखील आलेले नाहीत. काही वर्षांपूर्वी आमची दिंडी भंडीशेगावमध्ये असताना, या स्मशानभूमीत एका महिलेवर नुकतेच अत्यंस्कार झाले होते. त्याच दरम्यान खूप मोठा पाऊस झाल्याने हवेत गारवा वाढलेला होता. आमच्या दिंडीतील वारकरी जणू शेकोटी प्रमाणे त्या चितेच्या सभोवताली बसले होते. भंडीशेगावात दीड दिवसांचा दिंडीची मुक्काम असल्याने दुसऱ्या दिवशी तेथील राख आम्ही बाजूला काढून ठेवली. परिसर स्वच्छ करून त्याच ठिकाणी आम्ही विश्रांती देखील घेतली होती. दिंडीतील महिला वारकरी देखील येथे थांबतात. तसेच, स्वयंपाक देखील याच ठिकाणी करतात, सर्वजण मिळून भजन, भोजन केल्यानंतर येथे विश्रांती देखील घेतो. 

हरि उच्चारण मंत्र पै अगाध । पळे भूतबाधा भेणे तेथें ॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । असे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात आहे. 




संत तुकाराम महाराजांनी “आम्हा भय चिंता नाही धाक | जन्म मरण नाही एक | झाला इहलोकी परलोक | आले सकळीक वैकुंठ, असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे देवाचे नामस्मरण करणाऱ्यांना कशाहीची चिंता, भिती वाटत नाही असे, पाटील महाराज यांनी सांगितले.

----------

Tuesday, May 20, 2025

मधमाशी : पर्यावरणातील परिस...

---------------
 जागतिक मधुमक्षिका दिन विशेष…

----
विनोद कामतकर

9850434353
---
पर्यावरणातील पशु, प्राणी, पक्षी व किटक प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे पर्यावरणाच्या विकासासाठी कारणीभूत ठरतात. आपल्यास लाभलेल्या जैविक संपत्तीमध्ये मधमाशांचे अनन्यसाधारण महत्व आहे. मधमाशी हा शत्रू किटक नसून तो मित्र किट आहे,  याची जाणीव सर्वांना असणे महत्वाचे असून त्या पर्यावरणातील परिस आहेत. झाडांची बेसुमार तोड, कीटकनाशकांचा अतिरेक वापरामुळे मधमाश्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

दरवर्षी २० मे जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा होतो. मधमाश्या, वनस्पती, पिकं यांच्यातील सहजीवन सगळ्यांसाठी कल्याणकारी असते. मधमाश्यांच्या फुलातील हालचालींमुळे म्हणजे परागीकरणाच्या क्रियेमुळे फलधारणा घडते.  सपुष्प वनस्पतींचे अस्तित्व मधमाशांवर विसंबून असते. आपल्या जेवणातील तीन घासांपैकी एक घास मधमाशअयांमुळे मिळतो. त्यांच्याकडून आपल्याला पौष्टिक मध मिळतो. 

शास्त्रीय पद्धतीने मधमाशापालन व्यवसाय करून मधाशिवाय मेण, पराग, रॉयल जेली (राजान्न) मिळते. त्याचा वापर निरोगी, दीर्घायुष्यासाठी करु शकतो. मधमाशांमुळे पिकांमध्ये त्वरीत परागीकरण घडते. पीक, फलोत्पादनात दुपटीपेक्षा अधिक वाढ होते. कृषी उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. शेत-शिवारातील मोहोळ म्हणजे समृद्धी, शुभशकुन समाजावे. त्यामुळे मधमाशी हरितक्रांतीच्या शिल्पकार असून पर्यावरणातील अन्न साखळ्या सबलीकरणासाठी कारणीभूत ठरतात. त्यांचा क्वचित प्रसंगीचा डंख गुणकारी ठरु शकतो. त्यांचे विष सुद्ध काही दुर्धर आजारासाठी गुणकारी ठरते. 

------
दत्त महाराजांचे गुरु....
श्री दत्त महाराजांनी २४ गुरु केले. त्यामध्ये मधमाशीला त्यांनी गुरु केले आहे. मधमाशी अनेक अडचणींना सामना करून मध गोळा करते. तोच मधसाठा तिच्यासाठी घातक ठरतो. कुणाच्या दृष्टीस पडू नये अशा कड्या-कपारीमध्ये किंवा उंच ठिकाणी मधमाशी पोळे बांधून त्यामध्ये मधाचा साठा करते. पण, मध पळविणारे लोक अचूकपणे तो मध पळवितात. त्याप्रमाणे आवश्यकतेहून जास्त संचय करणे योग्य नाही, असा संदेश दत्तमहाराजांनी गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिला आहे. 
---

माणसांच्या चुकांमुळेच..
.

मुंग्या, मधमाश्या, कीटक, गांडुळे, वटवाघूळ, साप पक्षी असेच सर्वच जीव शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत करतात. यात मधमाश्या आघाडीवर असतात. त्यांचे महत्व अबाधित आहे. फुलांचे फळात रुपांतर करण्यात मधमाश्या पटाईत असता. त्याशिवाय दुसरे कीटक हे काम करु शकत नाहीत. पूर्वी मधमाशांची पोळी प्रामुख्याने काटेरी झाडीवर असायची. पण, अलीकडच्या काळात ही पोळी जांभूळ, आंबा, नारळ झाडांसह घरात, भिंतींवर दिसू लागली आहेत. माणसांच्या चुकांमुळे त्यांच्या नैसर्गिक अधिवास बदल केलाय, तो फक्त माणसांच्या चुकांमुळेच.

----
मधमाशीपालन कृषिपूरक व्यवसाय

मधमाशी पालन हा चागंला कृषिपूरक व्यवसाय आहे. खादीग्रामोद्योग महामंडळ, महाबळेश्वर येथील मधुमक्षिका पालन केंद्रातर्फे त्याचे प्रशिक्षण देण्यात येते. याद्वारे चांगला रोजगार मिळतो. डाळींब व वेलवर्गीय प्रजातींच्या पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मधमाशी खूप महत्वाचे माध्यम आहे. मधमाशी पेट्या भाडोत्री देण्याचा व्यवसायाद्वारे रोजगार चागंला रोजगार मिळतो, असे प्राणीशास्त्रच्या अभ्यासिका प्रा. रश्मी माने यांनी सांगितले. 

------

‘मधमाशी मित्र’ संकल्पनेची गरज..

मधमाशांचे पोळं जाळण्याचा अघोरी प्रकार अनेक ठिकाणी घडताेय. मोठी झाडं नसल्याने मधमाशी शेत-शिवारातून शहराकडे येत आहेत. शास्त्रीय पद्धतीने मधमाशांना त्रास होऊ न देता पोळे काढण्याचे प्रशिक्षणाची गरज आहे. प्राणीमित्र, सर्प मित्रांप्रमाणे आता ‘मधमाशी मित्र’ या संकल्पना कृतीशील होण्याची गरज असल्याचे, पर्यावरण स्नेही मीना मोकाटे यांनी सांगितले. 

-----

मधमाशी विविध प्रकारच्या वनस्पतींचे परागीभवन मधमाशाच करु शकतात. त्यांचे प्रमाण कमी झाल्यास आपल्या खाद्यापदार्थताली अनेक घटक, वनस्पतींच्या प्रजाती  नष्ट होऊन अन्नधान्याचा तुटवडामुळे भूकबळी वाढण्याचा धोका आहे. मधमाशांचे महत्व वेळी आेळखून त्यांचे संरक्षण, संवर्धन आवश्यक. स्थानिक वृक्ष लागवडीला  प्राधान्य द्यावे. सर्वच कीटकांना शत्रू नाहीत. रासायनिक औषधांचा अतिरेक बंद व्हावा. शाश्वत शेतीकडे वेळीच न वळणे हाच शेवट पर्याय आहे, असे  पर्यावरणशास्त्र अभ्यासिका प्रिया फुलंब्रीकर सांगतात. 




Saturday, March 29, 2025

गवताळ माळरान गवताळ माळरानची सफारी

गवताळ माळरानची सफारी..

. ____

 रानवेध.. 

 _____

 _जंगल हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहते ते घनदाट झाडी, वाघ बिबट्याची डरकाळी, मुक्तविहार करणारे चिकार, चितळ हे हरिण कुळातील प्राणी असे चित्र डोळ्यांसमोर उभारते. चित्रपट अथवा दूरचित्रवाणीवर पाहिलेल्या जंगलाच्या संकल्पनेस सोलापुरातील उघड्याबोडक्या मला जंगल पाहताना छेद जातो. जंगल अन तेही माळरानाचे, ही संकल्पना काहींना लवकर पचनी पडत नाही. पण, उघड्या बोडक्या वाटणाऱ्या सोलापुरातील माळरानावर जैवविविधता, समृद्धतेने नटलेली आहे, हीच तर सोलापूरची समृद्धता.

 'गवताळ माळरानाचा राजा' अशी उपाधी असणारा माळढोक व तणमोरपक्षी, हे सोलापूरचे भूषण. जगभरातच त्यांची संख्या घटली असून सोलापूर देखील त्या अपवाद असणार. पण, क्वचितप्रसंगी का असेना हा गवताळ माळाचा राजा हमखास दर्शन देतो. अशा या येथील समृद्ध माळरानात वनविभागाने सफारी सुरू केली आहे. विविध प्रकारचे वन्यप्राणी, शिकारी पक्षी, माळरानांवरचे पक्षी आणि फुलपाखरे पाहण्याची संधी सोलापूर येथील बोरामणी गवताळ सफारीच्या माध्यमातून निसर्गप्रेमींना अनुभवत आहेत. त्यास राज्यभरातून प्रतिसाद वाढत असून सोलापूरच्या निसर्ग पर्यटनास नव संजीवनी मिळाली आहे. पुणे, मुंबई, हैदराबाद येथील काही पर्यटकांनी नुकताच येथील सफारीचा आनंद घेतला काहींनी तर माळाराणावरील माचानावर रात्रभर मुक्काम ठोकून प्राण्याचे निरीक्षण केले. येथे पर्यटकांसाठी ऑनलाइन आरक्षणाची सोय सफारीसाठी ऑनलाइन आरक्षणाची सोय करण्यात आली आहे. बारामती आणि इंदापूर भागातील वनविभागाच्या माळरानांवर वन विभागाने गेल्या वर्षी सुरू केलेल्या गवताळ सफारीला पर्यटकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर सोलापूर देखील पर्यटनाचे नवे क्षेत्र विस्तारत आहे. दोन महिन्यांपूर्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते याचा शुभारंभ झाला. तत्कालीन उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक, पुण्याचे मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण यांच्या पुढाकारातून ही संकल्पना गतिमान झाली आहे. __ हे प्राणी पाहता येतील बोरामणी माळरानांवर लांडगा, कोल्हा, खोकड, काळवीट, नीलगाय, रानससा, रानडुक्कर, रानमांजर, उदमांजर, म्हसण्या मांजर आणि माळसरडा यांचा अधिवास आहे. तसेच सर्पमार गरुड, मॉन्टेक्यूचा भोवत्या, मोर, खंड्या, पिवळ्या गाठीची माळ टिटवी, सातभाई व्हल्ले, हरियालसह विविध प्रकारचे शिकारी पक्षी आणि आणि माळरानांवरचे पक्षी आणि फुलपाखरे बघायला मिळतील.ॉ

 ___ 

 बोरामणी गवताळ सफारीचे ऑनलाईन बुकींग सुरु सफारी ही दोन टप्यात करण्यांत आली असून, सकाळची वेळ 6:30 ते 10:30 आणि दुपारची वेळ 3:30 ते 6:30 ठेवण्यात आली आहे. 

 __ 

 बोरामणी गवताळ सफारी येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मचाण, शौचालय इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. सदरची सफारी ही स्वतःच्या गाडीने करावयाची असून, सोलापूर वनविभागातर्फे गाईड घेणे बंधनकारक आहे. यामध्ये सफारी ५०० शुल्क सोबत गाईड ५०० रुपये, कॅमेरा (असल्यास) १००/-शुल्क असे एकूण फी रु. ११००/- आकारण्यांत येणार आहे. बुकींग करतेवेळी सदरचे पेमेंट ऑनलाईन पध्दतीने करता येईल. सफारीच्या वेळेस एका वेळी ४ ते ५ गाड्या सोडण्यांत येतील. ___ 

बोरामणी येथे सफारी सोबत नाईट स्टेची सोय करण्यात आलेली आहे. तरी या नाईट स्टे साठी एक वेळेस 4 व्यक्ती (प्रत्येक व्यक्ती रु. २५०/ शुल्क) असे एकूण रु. १०००/- शुल्क व सोबत सोलापूर वनविभागातर्फे दिला जाणारा गाईड रु. ५००/- शुल्क असे एकूण रु. १५००/-शुल्क देऊन आपण संपूर्ण रात्र मंचानवरती नाईट स्टे करु शकता व निसर्गचा अनुभव घेऊ शकता. सदर ऑनलाईन बुकिंग फोन पे, गुगल पे व इतर ऑनलाईन बँकिंगव्दारे करता येईल, असे सहाय्यक उपवनसंरक्षक अजित शिंदे यांनी सांगितले. 

 ___

Wednesday, June 5, 2019

पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा

नमस्ते मित्रांनो,
आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नियमित ब्लाॅगलेखन करण्याचा संकल्प करत आहे. भेटत राहू.

Tuesday, May 2, 2017

महामार्गावर चिरडतात शेकडो वन्यजीव...

निष्पाप जीवांचा अंत....--------------
-विनोद कामतकर, सोलापूर
----





 चारही दिशांनी येणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराज्य रस्त्यांनी सोलापूरशहर जोडलेले आहे. रस्त्यांमुळे शहराची प्रगती हे वास्तव आहे. पण, त्याच रस्त्यांवरून येजा करणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अनेक निष्पाप वन्यजीव चिरडले जातात. दरवर्षी त्यांची संख्या शेकडोंच्या पुढे आहे. माणसांबाबत संवदेनशील असणारी यंत्रणा मुक्या प्राण्यांबाबत मात्र किती अंसवेदशील आहे, हे दरवर्षी घडणाऱ्या दुर्घटनांच्या वाढत्या आकडेवारून स्पष्ट होते. ना चिंता ना काळजी, अशीच स्थिती वाहनाचालकांची व वन्यजीवांसाठी कार्यरत असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचीही आहे.

पंढरपूर, अक्कलकोट व तुळजापूर या धार्मिक तीर्थक्षेत्रांमुळे सोलापूरला दरवर्षी हजारो भाविक येतात. त्यांच्यासह स्थानिक वाहनांचा भरधाव वेग सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबर लांडगा, कोल्हा, साळींदर, उदमांजर, मसण्यामांजर, मुंगूस, काळवीटांवर जिवावर बेततोय. वन्यजीव अभ्यासकांच्या दृष्टीकोनातून गवताळ माळरांचा जिल्हा अशी खास आेळख असलेल्या सोलापूरात माळढोक पक्ष्यांबरोबर जिल्ह्यातील पाणवठ्यांवर अनेक दुर्मिळ व स्थलांतरीत पक्षी येतात. देशातील सुमारे ६८ पेक्षा जास्त प्रजातींची फुलपाखरे, वटवाघूळ, लांडगा, तरस, कोल्हे या वन्यजीवांसह अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अनेक जाती आहेत. जैवविवधेतने संपन्न असलेल्या सोलापूरातील वन्यजीवांना वाढत्या वाहतुकीची दृष्ट लागल्याचे चित्र आहे. वेगाने रस्ता आेलांडता न आल्याने साप, सरडे, उदमांजर,  रानमांजर, घोरपड, साळींदर रोज प्राण गमावत आहेत.

काही दिवसांपूर्वी सोलापूर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तूर (ता. दक्षिण सोलापूर ) येथे वाहनाच्या धडकेने एक कोल्हा व एक रानमांजराचा मृत्यू झाला. त्यानंतर होटगीस्टेशन परिसरात एक काळवीट वाहनाच्या धडकेने जखमी झाले. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात फिरणाऱे वन्यजीवांना वाहनांचा मोठा धोका आहे.


माळरानावरील ‘वाघ’ही चिरडून ठार
वाघ या राष्ट्रीय प्राण्यांबाबत शासन व प्रशासनासह सर्वच घटक फारच जागरुक आहेत. पण, माळरानावरील ‘वाघ’अशी उपाधी असणारा लांडगा बाबत कमालाची अनास्था आहे. देशात झपाट्याने कमी होत असलेल्या प्राण्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. अक्कलकोट रस्त्यावर वळसंग परिसरात दीड वर्षांपूर्वी दोन लांडग्यांचा मृत्यू झाला.

नेचर कॉन्झर्व्हेशन सर्केलचे सर्व्हेक्षण

येथील नेचर काॅन्झर्व्हेशन सर्केलने अक्कलकोट, पुणे, तुळजापूर, मंगळवेढा, बार्शी रस्त्यांच्या दुतर्फो आढळणारे वन्यजीव व त्यांचे अपघात या विषयावर गेल्या चार वर्षांपासून (सन २०१२ पासून) सर्व्हेक्षण केले आहे. तर, विजापूर- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वन्यजीव व अपघातांचे सर्वेक्षण रानवेधन निसर्ग मंडळाने केले. दोघांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून वन्यजीवांबाबतची अनेक धक्कादायक माहिती समोर आली. आपल्या परिसरात अत्यंत दुर्मिळ असणारा मलकोहा पक्षी अक्कलकोट रस्त्यावर गेल्यावर्षी मृत्यूमुखी पडल्याचे आढळले.


आठ प्रकारच्या सापांचा समावेश
रस्त्यावरील भरधाव वाहनाखाली आठ पेक्षाजास्त जातीचे साप चिरडले गेलेत. त्यामध्ये प्रामुख्याने नाग, घोणस, मण्यार या विषारी जातीसह मांडूळ, धामण, गवत्या, तस्कर, धुळनागीन या बिनविषारी सापांचा समावेश आहे.


एकाच दिवशी १२८ फुलपाखरं ठार
किटकशास्त्र विषयाचा अभ्यासक राघवेंद्र वंजारी व सागर सुरवसे या तरुणांनी गेल्यावर्षी (सन २०१५-१६) पावसाळ्यात बाळे ते मार्केटयार्ड या रस्त्यावर मृत्यूमुखी पडलेल्या फुलपाखरांचे सर्व्हेक्षण केले. त्यामध्ये एकाच दिवशी केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १२८ फुलपाखरं मृत्यूमुखी पडल्याचे आढळले. त्यामध्ये २३ प्रकारच्या फुलपारखांच्या प्रजातींचा समावेश होता. लाईन प्रजातीचे फुलपाखरांची संख्या सर्वांधिक होती. रस्त्यांवर चिरडणाऱ्यामध्ये ढालकीडा,ड्रॅगन फ्लाय.


वन्यजीव ठराविक ठिकाणीच रस्ता आेलांडतात
बहुतांश वन्यजीव ठराविक ठिकाणाहून येजा करतात किंवा रस्ता आेलांडतात, असे अभ्यासकांच्या निष्कर्षातून पुढे आले. कळपातील प्रमुख लांडगा किंवा कोल्हा पुढे निघाल्यानंतर त्याच्या मागोमाग सर्वजण निघतात.प्रमुख नर ज्या रस्त्याने येजा करतो, त्याच रस्त्याने कपळातील इतर प्राण्यांची येजा असते. जवळचा दुसरा मार्ग असला तरी त्याच मार्गाचा वापर करतात.त्यामुळेच रस्ता आेलांडताना भरधाव वाहनाची धडक त्यांना बसते.त्यामुळे रस्ता दुतर्फो वन्यजीवांच्या छायाचित्रांसह त्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृतीचे फलक लावल्यास थोडीफार जागृती होईल.



स्वयंसेवी संस्थांची धडपड
रस्ते अपघात जखमी झालेल्या वन्यजीवांवर उपचारासाठी नेचर कॉन्झर्व्हेशन सर्केल संस्था, पीपल फॉर अॅनीमल,अरिहंत यासह काही स्वयंसेवी संस्था, वन्यजीव प्रेमी मदतीसाठी पुढाकार घेतात. नेचर कॉन्झर्व्हेशनचे सदस्य रस्त्यांवर एखादा वन्यजीव,पक्षी मृत्यूमुखी झाल्याचे दिसताक्षणी मृतदेह बाजूला काढून ठेवतात.
-----------------

हे हवेत उपाय

- वन्यजीवांचा अधिवास असलेल्या परिसरात त्यांच्या छायाचित्रांसह जागृती फलक लावणे
- फुलपाखरांच्या संवर्धनासाठी ते ज्या झाडांवर अंडी घालातत ते संरक्षित ठिकाणी लावून जोपासना करणे
- नवे राष्ट्रीय महामार्ग करताना वन्यजीवांना रस्ता आेलांडण्यासाठी अधिवासाच्या भागात छोटा पूल किंवा मोरी बांधणे
- अभयारण्य प्रमाणे रस्त्यांवर सावधनतेचे फलक
---------------------------------------------

Sunday, April 30, 2017

श्रीराम वंदना

शौनक अभिषेकींच्या आवाजातील श्रीराम वंदना . शब्द वाचून ऐकायला सुंदर वाटतं .
नादातुनी या नाद निर्मितो
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
नाद निर्मितो मंगलधाम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चैतन्यात आहे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सत्संगाचा सुगंध राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
आनंदाचा आनंद राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
त्रिभुवनतारक आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुखकारक हा आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
श्रद्धा जेथे तेथे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
शांती जेथे तेथे राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सबुरी ठायी आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चैतन्याचे सुंदर धाम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पुरुषोत्तम परमेश राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
भक्तिभाव तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
निर्गुणी सुंदर आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
लावण्याचा गाभारा
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कैवल्याची मूर्ती राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील स्फूर्ती राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
अत्म्याठायी आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पर्मात्माही आहे राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सगुणातही आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
निर्गुणी सुंदर आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
जे जे मंगल तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुमंगलाची पहाट राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सृष्टीचे ह्या चलन राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कर्तव्याचे पालन राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दु:ख निवारक आहे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
स्वानंदाच्या ठायी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुंदर सूर तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
शब्द सुंदर तेथे राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सकल जीवांच्या ठायी राम.
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
वात्सल्याचे स्वरूप राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सुंदर माधव मेघ श्याम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दशरथ नंदन रघुवीर राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
अयोध्यापती योद्धा राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रघुपती राघव राजाराम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रामनाम सुखदायक राम ..
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सकल सुखाचा सागर राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील जागर राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
रामभक्त नीत स्मरतो राम .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कुशलव गायिणि रमतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
हनुमंताच्या हृदयी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
जानकी वल्लभ राजस राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
चराचरातील आत्मा राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
समर्थ वचनी रमला राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कुलभूषण रघुनंदन राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
राम गायिणि रमतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
स्वरांकुरांच्या हृदयी राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
भक्तीरंगी खुलतो राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दाशरथी हा निजसुखधाम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
कौसल्यासुत हृदयनिवास
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
राजीवलोचन पुण्यनिध्य हा
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
सीतापती कैवल्य प्रमाण
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
पत्नीपरायण सीताराम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
लक्ष्मण छाया दे विश्राम
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
आदर्शांचा आदर्श राम
।। श्री राम जय र ाम जय जय राम ।।
एक वचनी हा देव महान
।। श्री राम जय राम जय जय राम ।।🙏🙏🙏🙏🙏🙏

*वने, वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धनासाठी 'हॅलो फॉरेस्ट'*

*वने, वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धनासाठी 'हॅलो फॉरेस्ट'*
=============================
*_१९२६ या 'टोल फ्री' क्रमांकावर २४ तास सेवा_*
=============================
_वनांचा र्‍हास आणि वन्यजीवांचा शिकारींपासून बचाव करता यावा, यासाठी 'हॅलो फॉरेस्ट' ही 'टोल फ्री 'हेल्पलाईन सुरू होणार आहे. आता एका 'क्लिक'वर वने, वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन तसेच नागरिकांना थेट समस्या, तक्रारी मांडता येतील. राज्याचे वने व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम राबविला जाणार आहे.
पोलीस प्रशासनाच्या धर्तीवर वनविभागाचे जाळे गाव-खेड्यात पसरविण्यासाठी वनविभाग सरसावला आहे. विशेषत: वने, वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राज्यातील ११ प्रादेशिक, तर चार वन्यजीव विभागांना लक्ष्य करताना शासनाने वनांची समृद्धी आणि वन्यपशुंचे संवर्धन याविषयी कृती आराखडा तयार केला आहे. 'हॅलो फॉरेस्ट'या हेल्पलाईनबाबत वनाधिकारी, वनकर्मचार्‍यांना माहिती मिळावी, यासाठी राज्यभरात प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जात आहेत. त्याअनुषंगाने सोमवारी २१ नोव्हेंबर रोजी अमरावतीत वनकर्मचार्‍यांची कार्यशाळा घेण्यात आली. यात नागरिकांचे सहकार्य घेण्याविषयी सर्वाधिक भर देण्यात आला आहे.
*_पाच प्रकारच्या क्रमांकावर वने, वन्यजीवांबाबत विविध सुविधा, समस्या जाणून घेतल्या जातील. या हेल्पलाईनमध्ये जंगल ते मंत्रालय असा प्रवास राहणार आहे. जंगलात लागणारी आग, वन्यपशुंची शिकार, अवैध वृक्षतोड, वनविभागातील व्यापार,जंगलांची माहिती आदी बाबींचा समावेश राहणार आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून आलेली माहिती ही उपवनसंरक्षक, मुख्यवनसंरक्षक, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वनसचिव ते वनमंत्री अशी सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. ज्या वनपरिसरातून ही माहिती मिळाली त्या भागातील उपवनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षकांच्या मोबाईलवर 'मॅसेज'द्वारे ती पोहोचावी, या पद्धतीने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे._*
_वनविभागाच्या वेबसाईटवर वनाधिकार्‍यांचे मोबाईल क्रमांक आणि दैनंदिन गोषवारा टाकण्यात आला आहे. त्यामुळे या हेल्पलाईनचा रोज किती जणांनी वापर केला, हे मंत्रालयातही बघता येणार आहे. या हेल्पलाईनमुळे जंगलांचा होणारा र्‍हास आणि वन्यपशुंच्या शिकारीवर नक्कीच आळा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 'टोल फ्री' क्रमांकामुळे नागरिकांना वने, वन्यजीवांबाबत आता थेट तक्रारी, समस्या मांडता येतील. तांत्रिकदृष्ट्या 'हॅलो फॉरेस्ट' सुसज्ज झाले आहे. केवळ शुभारंभाची औपचारिकता शिल्लक आहे._
*_'टोल फ्री' क्रमांकावर २४ तास सेवा_*
■ *या हेल्पलाईनचा 'टोल फ्री' क्रमांक १९२६ असून २४ तास ही सेवा सुरू राहणार आहे. मुंबईत या क्रमांकाचा नियंत्रण कक्ष राहणार आहे. पाच क्रमांकावर वने, वन्यजीवांबाबत तक्रारी देण्याची सुविधा देण्यात आली आहे. अशी देता येईल तक्रार*

■ *शून्य क्रमांक - आपत्कालीन व्यवस्था, शिकार, वृक्षतोड, अतिक्रमण*
■ *एक क्रमांक - ग्रीन महाराष्ट्र, ग्रीन आर्मी, तीन कोटी वृक्ष लागवड*
■ *दोन क्रमांक - वनविभागातील इको टुरिझम, जंगल सफारी आदी.*
■ *तीन क्रमांक - वनविभागात व्यापार, गौण वनउपज, तेंदूपत्ता, सागवान*
■ *चार क्रमांक - जंगलाबाबत माहिती, शेती नुकसान,वन्यप्राण्यांवर हल्ला आदी.*