Sunday, April 30, 2017

सोलापूरातील पर्यटन स्थळ


- विनोद कामतकर
---------
कर्नाटक व तेलंगण राज्याच्या सीमालगत असलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यात धार्मिक पर्यटन व निसर्ग पर्यटनाचा आनंद घेता येतो.
शहरापासून ११० किलोमीटर अंतरावरील अकलूज (ता. माळशिरस) येथील किल्यात शिवसृष्टी उभारण्यात आलीय. त्याच परिसरातील आनंदी गणेश, सयाजीराजे वॉटरपार्क आहे. त्याठिकाणी राहण्यासाठी चांगले लॉज व हॉटेल उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचे दैवत असणारे पंढरपूर अध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र आहे. विठ्ठलाच्या दर्शनानंतर  त्या शेजारील गोपाळपूर, शहरातील विविध मठ मंदिर प्रेक्षणीय आहेत. देशातील अतीसंकटग्रस्त प्रजातीमधील माळढोक पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणारे नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे अभयारण्य आहे. लांडगे, खोकड, काळवीटांसह अनेक स्थानि व स्थलांतरीत पक्षी-प्राण्यांचा अधिवास येथे आहे. येथे वन्यजीव विभागाचे विश्रामगृह आहे.
शहरापासून ४५ किलोमीटर अंतरावर स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट हे अध्यात्मिक क्षेत्र आहे. त्या शेजारील शिवपुरी येथे अग्निहोत्र चालते. सोलापूर शहरामध्ये ग्रामदैव शिवयोगी सिद्धरामेश्वररांचे मंदिर आहे. मंदिराच्या भोवताली तलाव, जवळच भुईकोट किल्याची तटबंदी असे सुंदर अध्यात्मिक स्थान आहे. थोरमानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक येथील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आहे. शहरापासून अवघ्या दहा किलोमीटवर सिद्धेश्वर वनविहार हे राखीव वनक्षेत्र आहे. शहराच्या भोवती दोनशे हेक्टर राखीव वनक्षेत्र असणारे मुंबईनंतर सोलापूर हे राज्यातील दुसरे शहर आहे. या ठिकाणी कोल्हा, खोकड, मोर, घोरपड, ससे यासह अनेक स्थानिक स्थलांतरीत पक्षी आढळतात. दुर्मिळ आैषधी वनस्पती येथे आढळतात. शहरापासून ३५ किलोमीटरवर सीना व भीमा नदीच्या संगमावर हत्तरसंगकुडल हे अध्यात्मिक पर्यटनस्थळ आहे. मराठी भाषेतील पहिला शीलालेख येथे आढळला असून उत्खननामध्ये प्राचीन हरिहरेश्वर मंदिर सापडले. येथील बहुमुखी शिवलिंगावर ३६० छोटे शिवलिंग आहेत, हे दुर्मिळ ठिकाण आहे. शहराच्या अवतीभोवती कृषीपर्यटन केंद्र आहेत. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात या पर्यटन केंद्रांमध्ये हुरडापार्टी होतात. सोलापूराची शेंगा चटणी व ज्वारीची कडक भाकरी येथील बहुतांश हॉटेल, ढाबे व दुकानांमध्ये सहज  मिळतात.
---------

No comments:

Post a Comment